आज संपुर्ण दिवसभरात 'सौरभ कालिया' हे नाव बहुतेक न्युजचैनल्स वर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण कारगील युद्धाला आज १६ वर्षे पुर्ण होत आहेत. देशाचं रक्षण करताना आलेला तो एक दुर्देवी अंत. शहिद सौरभ कालिया यांचे भाऊ प्रा.वैभव कालीया यांच्या भेटीची आठवण शेअर करावीशी वाटते.
मे २०१० मध्ये आम्ही उत्तर भारत फिरण्यासाठी गेलो होतो. मनाली ते अमृतसर असा प्रवास करताना वाटेत हिमाचल प्रदेशातील पालमपुर हे एक निसर्गरम्य गाव लागते. १९९९ साली कारगील युद्धात शहिद झालेले कँप्टन विक्रम बात्रा आणि कँप्टन सौरभ कालिया हे याच गावचे सुपुत्र. पालमपुर गावातुनच आमची गाडी जाणार असल्याने आम्ही विक्रम बात्रा यांच्या घरी जाण्याचे निश्चीत केले. पालमपुर गावात प्रवेश करताच २ बाईकस्वारांना आम्ही गाठले आणि विक्रम बात्रा यांचे घर विचारले. कँप्टन विक्रम बात्रा यांच्या मातोश्रींनी पाणावलेल्या डोळ्यांनी बात्रा यांच्या आठवणी जाग्या केल्या. बात्रा यांचा गणवेश त्यांचा अस्थीकलश ह्या सर्व मन हेलावुन टाकणार्या आठवणी त्यांनी जतन करून ठेवल्या आहेत. बोलता-बोलतानाच कँप्टन सौरभ कालिया यांचे भाऊ वैभव कालिया यांच्याबद्दल सांगितले. त सध्या पालमपुर येथील एका विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तेथे पोहोचल्यावर प्रा.वैभव कालिया यांच्याबद्दल चौकशी केली प्रारंभी ते व्यस्त असल्याचे कळले. थोड्या वेळाने ते बाहेर येताच विद्यापीठाच्या एका कर्मचार्याने ते आल्याचे आम्हाला खुणावले. बाहेर येउन ते गाडीत त्यांच्या गाडीत बसले, ते कार सुरू करणार इतक्यातच आम्ही त्यांना गाठले. व "आप ही सौरभ कालिया के भाई है क्या" असे माझा दादा जयेश मिंडे याने त्यांना विचारले. सौरभ कालिया हे नाव ऐकताच वैभव कालिया हे ताडकन उठुन गाडीबाहेर पडले. पुढे त्यांनी "आप कौन और कैसे आना हूआ" ? असे विचारले व केवळ शहिद सौरभ कालिया यांच्या प्रेमापोटी भेटण्यास आलो आहोत हे ऐकुन त्यांनाही गहिवरून आले. शहिद कँप्टन सौरभ कालिया यांच्या बालपणीसह अनेक आठवणी त्यांनी जाग्या केल्या. नंतर त्यांनी घरी येण्यासाठी आग्रह केला मात्र आमच्या पुढील पुर्वनियोजीत दौर्यामुळे ते काही शक्य झालं नाही व आम्ही त्यांचा निरोप घेतला.
म्हणतात कि मरणानंतर वैर संपत मात्र कारगील युद्धातील या जाँबाज भारतीय वीरांच्या बाबतीत मात्र तसे घडले नव्हते. शरीरावर असंख्य भेगा, हाताची बोटे, नाक-कान कापुन हाल-बेहाल करून भारतीय सैनीकांना मारण्यात आले होते. अगदी यमराजही नाकारेल अशा अत्यंत छिन्नविच्छींन्न अवस्थेत या वीरांचे मृतदेह त्यावेळी भारतीय लष्कराच्या हाती लागले होते. दुर्दैवाने या शहीदांचे वयोवृद्ध आईवडील व कुटुंबीय हे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. निर्दयी पाकड्ये सैनीक मात्र यांना आम्हीच मारलं असं छातीठोकपणे सांगत आहेत. सध्या हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवला जावा यावरून वादविवाद सुरू आहेत. आजही कारवाई होउ शकते, गरज आहे ती केवळ राजकीय ईच्छाशक्तीची.
प्रथमेश करजावकर.
०२-०६-२०१५


No comments:
Post a Comment