Friday, July 10, 2015

काय आहे व्यापम घोटाळा ?

मिहीर कुमार हा तरूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के सुदर्शन यांच्याकडं काम करत असे. सेवादार होता. त्याची अन्न निरीक्षक, फूड इन्सपेक्टर या पदावर मध्य प्रदेश सरकारच्या खात्यात काम करायची इच्छा होती. त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. ही २००७ सालातली हकीकत. मिहीरनं परीक्षेबाबत चौकशी केली, केव्हां, कुठं, विषय कोणते वगैरे. 

मिहीरला माहित असावं की परिक्षा देऊन रीतसर नोकरी मिळणं वगैरे खरं नाही, वशीला लागतो, भानगडी कराव्या लागतात. तो तसं सुदर्शनांकडं बोलला नसेल पण त्यानं परीक्षेबाबत मार्गदर्शन करा, ओळख बिळख सांगा असं सुदर्शनना सांगितलं असावं. सुदर्शननी त्याला त्या वेळचे शिक्षण मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांच्याकडं पाठवलं. भाजपचं सरकार होतं.शर्मा यांनी त्याला परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदींकडं पाठवलं. 

मध्य प्रदेश व्यावसायिक परिक्षा मंडळ ही सरकारनं स्थापन केलेली संस्था विविध पदांवरील आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या कॉलेजेसमधील प्रवेशासाठी परिक्षा घेते. शिक्षक, कॉन्स्टेबल, अन्न निरीक्षक, वजन माप निरीक्षक इत्यादी पदं या परिक्षेमधून भरली जातात. तसंच मेडिकल कॉलेजमधे प्रवेश देण्याआधी व्याशिमंची परिक्षा द्यावी लागते. विद्यार्थ्यानं परिक्षेचा अर्ज भरल्यावर त्याला रोल नंबर दिला जात असे. त्यानंतर त्यानं परिक्षा दिल्यावर पेपर तपासून झाल्यावर मार्क इत्यादी गोष्टींची नोदणी होऊन विद्यार्थी पास किवा नापास होत असे, तसं त्याला कळवलं जात असे. हा सारा व्यवहार कंप्यूटरवर होत असे. एक स्वतंत्र कंप्यूटर प्रणाली त्यासाठी व्याशिमंनं विकसीत केली होती. पंकज त्रिवेदी हे या व्यवस्थेचे प्रमुख होते.

मिहीर पंकज त्रिवेदींकडं गेला. तो तिथं गेला तेव्हां त्रिवेदींना एक मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांच्याकडून फोन गेला ‘ मिहीर हा सुरेश सोनींचा खास माणूस आहे.’ सुरेश सोनी कोण? हे संघाचे एक वरिष्ठ अधिकारी आणि भाजप आणि संघ यांतील संयोजन ही त्यांची जबाबदारी होती.

सुदर्शननी मिहीरला सांगितलं ‘ जेवढी चांगली माहित असतील ती उत्तरं लिही, ज्या  प्रश्नांची उत्तरं येत नसतील ते प्रश्न सोडून दे.’

मिहीरला अनेक प्रश्न आले नाहीत. 

परिक्षेचा निकाल लागला आणि मिहीर परिक्षेत सातव्या क्रमांकावर पास झाला.

राहुल यादव. शालांत परिक्षेत नापास झाला होता. तरीही व्याशिमं परिक्षेला बसला. त्यानं लखनऊमधून मुनीर यादव नावाचा माणूस आणला. त्याला पैसे दिले. अशी माणसं पुरवणाऱ्या अनेक संस्था उत्तर प्रदेशात आहेत. मुनीर राहुलच्या जागी परीक्षेला बसला.  त्याला कोणी अडवलं नाही. अशा माणसाला स्कोरर असं म्हणतात. स्कोरर परिक्षेला बसणार हे व्याशिमंला माहित होतं. तशी रीतसर व्यवस्थाच झालेली होती. राहुल यादव परिक्षा पास झाला.

राज्य दूध संघात कर्मचाऱ्यांची भरती होती. त्यासाठी प्रवेश परिक्षा. मनीष श्रीवास्तव या आयएसअधिकाऱ्याचा जावई तरंग शर्मा यानं एक रॅकेट तयार केलं होतं. संतोष गुप्ता हा त्याचा सहकारी. त्यांनी पाच जणांना ३० लाख रुपये घेऊन दूध संघाची परिक्षा पास करवलं. या व्यवहाराचं कमीशन म्हणून तरंगनं ६ लाख रुपये घेतले आणि उरलेली रक्कम व्याशिमंमधल्या प्रमुख सिस्टिम अनॅलिस्ट नितीन महिंद्र यांच्याकडं सरकवली. परिवहन, पोलीस इत्यादी खात्यातल्या नोकऱ्यांसाठी कामं करून देणारे गट काही माणसं घेऊन त्यानं तयार केला होते. 

२००४ ते २०१३ या काळात दरवर्षी ३०० ते ४०० विद्यार्थी घोटाळे करून पास झाले. त्यातले बरेचसे मेडिकल परिक्षेला बसले होते. अनेक वाटांनी ते पास झाले. एक वाट म्हणजे परिक्षार्थीचा रोल नंबर व्याशिमंला आधीच कळवला जात असे. त्यानंतर त्यानं पेपरात काहीही लिहिलं तरी तो पास होत असे. दुसरी वाट म्हणजे उत्तर प्रदेशातून मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी भाड्यानं आणले जात. त्यानं पेपर लिहायचा. कधी परीक्षार्थीच्या नावानं पेपर लिहायचा तर कधी स्वतंत्रपणे लिहायचा आणि नंतर तो विद्यार्थ्याच्या नावावर खपवायचा.

हे झाले राज्य पातळीवरचे संघटित प्रकार. जागोजागी, स्थानिक पातळीवर भुरटे उद्योगही भरपूर चालले होते. एक उदाहरण भोपाळमधलं. मेडिकल प्रवेशाची परिक्षा. परिक्षा पार पडली. केद्रावरून पेपर गोळा करून विद्यापिठात  न नेता तिसरीकडंच नेण्यात आले. तिथं ते पेपर बोगस लोकांकडून तपासून घेण्यात आले. गुण वगैरेची पत्रकं तयार करून नंतर ते विद्यापीठात नेऊन रीतसर निकाल जाहीर करण्यात आला.

हे सारं रॅकेट भाजपचे मंत्री लक्ष्मीकांत शर्मा वर्षानुवर्षं चालवत होते. शर्मा उमा भारती मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रीमंडळात होते. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं खाणी, शिक्षण इत्यादी खाती सांभाळली. खाण माफियाशी त्यांचा संबंध होता. २००८ मधे शर्मा खाण मंत्री होते. सतनाची एक खाण त्यांनी बिर्लागटातल्या एका कंपनीला दिली. खाण वाटपासाठी आलेले सर्व अर्ज शर्मांनी कोणतंही कारण न देता रद्द करून बिर्ला कंपनीला खाण दिली. हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयानं दिला. 

वरील सर्व घोटाळ्यांमधे सुधीर शर्मा हे गृहस्थ मध्यस्थाचं काम करीत. सुधीर शर्मा भारतीय जनता पक्षाच्या शिक्षण सेलचे प्रमुख होते. सरकारच्या तांत्रिक शिक्षण विभागातले अग्रवाल आणि दांधीर मोठी रक्कम गोळा झाली की सुधीर शर्माकडं सोपवीत. रात्री सुधीर शर्मा ती रक्कम लक्ष्मीकांत शर्मा यांच्या व्यक्तिगत स्टाफमधले मोहरसिंग यांच्याकडं पोचवत. जानेवारी १२ रोजी अग्रवाल यांनी शर्मांच्या हाती  १५ लाख रुपये दिले. पैकी १० लाख रुपये मंत्र्यांकडं पोचले         ( उरलेले? कमीशन? की मधल्या मधे मारले?). नंतर एकदा १०लाख, पुन्हा १५ लाख मंत्र्यांकडं पोचल्याची नोंद आहे.   

किती कोटी रुपयांची उलाढाल झाली असेल? १२०० ते ४००० व्यवहार झाले असतील. काही लोकांनी पाच लाख दिले काहीनी दोन दिले असतील. तीनेक लाख सरासरी धरली तर १२० कोटींचा व्यवहार झाला असेल. पैशाचा व्यवहार ही एक गोष्ट. लायकी नसलेली मंडळी पोलिस, मेडिकल कॉलेजमधे नेमली गेल्याचे कसे परिणाम होतील आणि किती काळ ते चालत रहातील ते सांगता येत नाही.

२००७ मधे व्यापमं चं ऑडिट झालं तिच्यातून सारं लफडं बाहेर आलं. ऑडिटमधे  अनेक गैरव्यवहार दिसले. उत्तर पत्रिका परवानगी नसताना नष्ट करणं हा गंभीर प्रकार कळल्यावर ऑडिटरनं ताशेरे मारले. पुढली कारवाई अटळ असल्यानं घोटाळा बाहेर आला.

घोटाळा घडला तो सगळा काळ भारतीय जनता पक्षाचे शिवराज सिंह चौहान यांचं राज्य होतं. घोटाळा बाहेर आल्या आल्या भाजपच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती म्हणाल्या ‘ हा तर बिहारच्या चारा घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे.’  

उमा भारती या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या बंडखोर आहेत. मध्य प्रदेशचं त्यांच्या पक्षाचं राजकारण त्याना मंजूर नाही. त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार होत्या. चौहान यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं त्यांना आवडलेलं नव्हतं.

बातमी फुटल्यावर मुख्यमंत्री चौहान म्हणाले ‘ सरकारच्या एकाद्या विभागात भ्रष्टाचार असणं शक्य आहे. परंतू सारं सरकारच भ्रष्ट आहे असं म्हणणं बरोबर नाही. या घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे.’ चौहान यांनी स्पेशल टास्क फोर्सकडं हे प्रकरण सोपवलं. नंतर तपासावर न्यायालयानं नजर ठेवायला सुरवात केली.

टास्क फोर्सनं १३० जणाना पकडलं. प्रथम लक्ष्मीकांत शर्मा फरार होते. नंतर सापडले. सुधीर शर्मांनीही काही काळ फरार राहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. टास्क फोर्सनं जबान्या घ्यायला सुरवात केली. त्यातली माहिती माध्यमांकडं पोचायला लागली. लाचेचे नेमके आकडे, देणाऱ्या घेणाऱ्यांची नावं, तारखा इत्यादी तपशील माध्यमांना मिळाले. व्यापमंच्या कंप्यूटरमधे तर मजाच होती. नितीन महिंद्र हे सिस्टिम अनॅलिस्ट असल्यानं त्यांनी सारी माहिती पद्धतशीर एक्सेल शीटमधे लिहून ठेवली होती. पैसे देणाऱ्याचं नाव, किती पैसे दिले, किती पैसे शिल्लक आहेत, पैसे कोणाला गेलेत ही सारी माहिती एक्सेलशीटमधे होती. पैकी एक शीट माध्यमांनी छापली.

जबानीमधे सरसंघचालक सुदर्शन आणि संघाचे नेते सुरेश सोनी यांची नावं आल्यावर  धमाल उडाली. सुरेश सोनी हे भाजप-संघ यांच्यातले संबंध हाताळतात. भाजप आणि संघाच्या शिबिरात ते नीतीमत्ता या विषयावर व्याख्यानं देत असतात. असंच एक नीतीमत्ता शिबीर भोपाळमधे व्हायचं होतं. सोनी नागपूरला असतांना म्हणाले की सुदर्शनजी आणि आपल्यावरचे आरोप तद्दन खोटे आहेत. नागपूरहून ते विमानानं भोपाळला पोचले. शहराच्या बाहेरच्या दाणापाणी नावाच्या हॉटेलात ते मुख्यमंत्री चौहान याना तीनेक तास भेटले. भेटीत काय घडलं ते संघसंस्कृतीतल्या सवयीनुसार अंतर्गत होतं, प्रसिद्धीसाठी नव्हतं. दुसऱ्या दिवशीच्या नीतीमत्ता शिबीरात सोनी हजर होते पण चौहान मात्र प्रकृती बिघडली असल्यानं ( तसं पत्रक काढण्यात आलं) गैरहजर होते. आणखी एकदा सोनी, संघचालक मोहन भागवत आणि चौहान यांची बंद खोलीत तीनेक तास बोलणी झाली. त्यातही काय घडलं ते कळायला मार्ग नाही.

या दरम्यान घडलेल्या दोन घटना अशा. एके दिवशी भोपाळच्या पोलिस मुख्यालयातून पत्रक निघालं की चालू असलेल्या चौकशीमधे सुदर्शन आणि सोनी यांची नावं आलेली नाहीत, त्यांच्याबद्दल केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत पोलिसांना कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. खुलासा पोलिसांनी केला.

पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ संघामधे सक्रीय कार्यकर्ते असलेले कर्मठ गृहस्थ रघुनंदन शर्मांनी पत्रकारांना सांगितलं ‘ घोटाळ्याच्या चौकशीचे तपशील माध्यमांना कसे पोचतात त्याचं आश्चर्य वाटतं. सरकारातलं, पोलिसांतलं कोणी तरी हे तपशील माध्यमांना पुरवत आहे. या प्रकरणाची चौकशी टास्क फोर्सकडून काढून घ्यावी, सीबीआयकडं सोपवावी.’

चौकशीबाबत मुख्यमंत्री चौहान म्हणाले होते की टास्क फोर्स कायद्यानुसार चांगलं काम करत असल्यानं चौकशी सीबीआयकडं देण्याची आवश्यकता नाही, देणार नाही.’

लक्ष्मीकांत शर्मा अर्थातच भाजपचे आणि संघाचे कार्यकर्ते. घोटाळ्यातले पैसे गोळा करून त्यांच्याकडं पोचवायचा उद्योग करीत सुधीर शर्मा. ते भाजप आणि संघाचे कार्यकर्ते. बरं तसे सामान्य कार्यकर्ते नव्हते. झाबुआ जिल्ह्यात त्यांची एसआर फेरोअलाईज नावाची खाण आहे. त्यांचे काही व्यवहार ( कायदेशीर?) इंडोनेशियात आहेत. त्यांच्याकडं ऑडी, स्कोडा इत्यादी गाड्यांचा ताफा आहे. संघाचे नेते सुरेश सोनी यांचा विमान प्रवासाचा खर्च त्यांनी काही वेळा केलेला आहे. 

या घोटाळ्यातले एक आरोपी अजय शंकर मेहता २५ जुलै २०१४ रोजी दोन महिन्यांच्या तुरुंगवासानंतर बाहेर पडले. ते जन अभियान परिषद या एनजीओचे उपाध्यक्ष होते. पोलीस कॉन्स्टेबलच्या लफडंभरतीच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. या संस्थेचे अध्यक्ष होते मध्य प्रदेशचे मुख्य मंत्री शिवराज सिंह चौहान. अनेक सनदी अधिकारी या संस्थेच्या कार्यकारिणीत होते. सरकार आणि एनजीओ यांना ही संस्था जुळवून देत असे, सरकार आणि एनजीओ यांच्यात ही संस्था मध्यस्थ होती. 

मेहता बाहेर कसे पडले? त्यांना जामीन मिळाला. जामीन कोणी दिला? भोपाळमधले एक बिझनेसमन पुरुषोत्तम तोतलानी यांनी. तोतलानींची हॉटेलं आहेत, इतर अनेक उद्योग आहेत. मेहतांना आपल्याला कोणी जामीन दिला ते माहित नव्हतं. बाहेर पडल्यावर कळलं. याच घोटाळ्यातले  मुख्य आरोपी नितीन महिंद्र तुरुंगात होते. त्यानाही तोतलानी यांनीच जामीन देऊन सोडवलं. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले सिंडिकेट बँकेचे सीएमडी एस के जैन यांनाही जामीन देऊन कोठडीबाहेर काढलं. तोतलानी हे मध्य प्रदेशातलं मोठ्ठं प्रस्थ आहे. त्यांचे खूप बिझनेसेस आहेत. ते संघ-भाजपच्या लोकांना आर्थिक मदत करत असतात.

मध्य प्रदेशात एक मंत्री, त्याचे पक्षातले सहकारी, अनेक बिझनेसमन, नोकरशहा, या मंडळींची सांस्कृतीक आणि नैतिक घडण घडवणारा रा स्व संघ आणि संघानं तयार केलेला भाजप गुंतला होता. मध्य प्रदेशात १० वर्षं भाजपची सत्ता होती. त्याच काळात दिल्लीत काँग्रेस प्रणीत आघाडीचं सरकार होतं आणि त्यात टूजी घोटाळा झाला. टू जी घोटाळा झाला तेव्हां भाजपनं रान उठवलं, केंद्र सरकारचा राजीनामा मागितला, कित्येक दिवस लोकसभेचं कामकाज बंद पाडलं. पण त्याच वेळी खाली भाजपच्या सरकारात परिक्षा, नोकरभरती यामधे भ्रष्टाचार चालला होता. तो टूजी घोटाळ्यानंतर उघडकीला आला. मग काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते दिग्वीजय सिंग यांना जोर आला. त्यांनी मध्य प्रदेश सरकारविरोधात मोहीम उघडली भाजपचं म्हणणं होतं की टूजी घोटाळ्याला शेवटी प्रधानमंत्री जबाबदार असतो, त्यांनी राजीनामा द्यावा. मनमोहन सिंगांनी राजीनामा दिला नाही. दिग्वीजय सिंग यांचं म्हणणं होतं की शेवटी परीक्षा घोटाळ्याची जबाबदारी चौहान यांच्यावरच येते, त्यांनी राजीनामा द्यावा. चौहानांनी राजीनामा दिला नाही.

Saturday, July 4, 2015

मामला 'सोशल फोटो' शेअरींगचा.

मामला 'सोशल फोटो' शेअरींगचा.


     हेमा मालिनी यांच्यासह त्यांच्या कार अपघातात बळी पडलेल्या मुलीचे फोटो काल संपुर्ण दिवसभरापासुन व्हॉट्सअॅप, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कींग साईट्स वर फिरत आहे. या अपघाताने मागील आठवड्यात झालेल्या बस अपघातात बळी पडलेल्या दोन मुलींची आठवण करून दिली. त्या दोन मुलींना तातडीने मदत करण्याऐवजी लोकांकडून त्यांचे 'फोटोसेशन' सुरू होते. अखेर उपचारास विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला. एखादा अपघात झाल्यावर त्या अपघातातील लोकांना मदत करण्याऐवजी आजची तरूण पीढी हृदयशुन्यतेने त्यांचे फोटो काढून सोशल साईट्सवर टाकण्यात मात्र 'ऍक्टीव्ह' असते. वरून त्यावर अनेकदा अगदी खोचकपणे लिहीलेले असते की "ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि या अपघातात बळी पडलेल्यांना न्याय द्या". मुळातच त्या अपघातात एखाद्याने दुर्दैवी जीव गमावला असेल त्याला जीव गमावल्यानंतर नेमका कोणता न्याय मिळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. हा विचार मदत न करता निव्वळ पोस्ट शेअर करणार्यांच्या मनात येणार तरी कधी...!! दररोज देशात होणार्या अनेक अपघातांचे फोटो सोशल नेटवर्कींग साईट्स वर फिरत असतात. सर्व अपघात हे दुर्दैवीच, त्या अपघातांची भीषणताही तीतकीच दाहक. पण लोकांची वृत्ती मात्र तीच. यात फरक असतो तो केवळ चेहर्यांचा आणि स्थळाचा.
   गेल्या वर्षी कॉलेजमध्ये आमच्या 'Xpression Event' ला काही विद्यार्थांनी याच विषयावर ऍड सादर केल्या होत्या त्यांच्या विषयाचे खरचं कौतुक करावे लागेल. यावर कितीही जनजागृती केली तरी सोशल नेटवर्कींग वरून काय शेअर करावे हे सर्वस्वी वापरकर्त्यावर किंबहुना त्याच्या मानसीकतेवर अवलंबुन असते. त्यामुळे आपण काय शेअर करत आहोत त्या किती तथ्य आहे याचे भान नक्कीच बाळगायला हवे.

-प्रथमेश करजावकर.
 ४-७-२०१५

© Prathamesh Karjavkar.

Tuesday, June 16, 2015

'शिट्टी' गाजली, अन् वाजलीही.





वसई-विरारमध्ये पुन्हा 'ठाकूरशाही'.

     मिरा-भाईंदर म्हटले की गिल्बर्ट मेंन्डोंसा, उल्हासनगर म्हटले की पप्पु कलानी तसेच वसई म्हटले की हितेंद्र ठाकुर ही राजकीय समीकरणे च बनली आहेत. संपुर्ण राज्यभराचे लक्ष लागुन राहिलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या द्वितीय निवडणूकीचा आज निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे हितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडीला' जनतेने पुन्हा एकदा वसईच्या सत्तेच्या खुर्चीवर बसवले. ११५ पैकी तब्बल १०६ जागा मिळवत बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय प्रस्थापीत करत गड राखला आणि विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. आजचा हा निकालही ऐतिहासीकच म्हणावा लागेल. ३ जुलै २००९ साली वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाली  त्यानंतर २०१० साली महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत ८९ पैकी ६० जागा  जिंकत बहुजन विकास आघाडी ला स्पष्ट बहुमत मिळाले होते. बविआ च्या जिंकलेल्या उमेदवारांची ही आकडेवारी ६७% इतकी होती. मात्र २०१५ साली झालेल्या नविन प्रभाग रचनेनुसार एकुण जागांची संख्या ८९ वरून ११५ वर पोहोचली. गेल्या वेळचा रेकॉर्ड मोडुन काढत या निवडणुकीत बविआच्या विजयी उमेदवारांची आकडेवारी ९२% वर पोहोचलेली दिसते.
   गेल्या वेळ पेक्षा यंदा शिवसेनेने बविआ ला जोरदार टक्कर दिली होती. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक मुंबईतुन प्रचारासाठी दाखल झाले होते. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सुद्धा जंगी रोड शो झाला. तरीही शिवसेनेला अपेक्षीत यश मिळू शकले नाही.
     हितेंद्र ठाकुर यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे व मागील विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकुर यांच्या विरोधात पराभुत झालेले वसई चे माजी आमदार विवेक पंडीत हे ही प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत प्रचारापासुन दुर राहिले. याचाही फटका युतीला बसलेला आहे. तर अंतर्गत गटबाजीचा फटका भाजप ला बसलेला आहे. मागील निवडणुकीत महापालिकेतुन ५३ गावे वगळण्याच्या मुद्यावर 'जनआंदोलन समितीच्या' अजेंड्याखाली सर्वपक्षीय गट बविआ विरूद्ध एकत्रीत आल्याचा फटका बविआ ला बसला होता. यंदा मात्र जनआंदोलन समितीत फुट पडली व अनेक प्रभागांमध्ये उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र होते. या निवडणुकीत कोणतीही रिस्क घ्यायची नाही या हितेंद्र ठाकुर यांच्या भुमीकेमुळे तसेच कायद्यानुसार महिलांना ५०% आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक दिग्गज व विद्यमान नगरसेवकांचे पत्ते यावेळी कापले गेले. तरीही कोणत्याही उमेदवाराने बंड पुकारून पक्षाला याचा फटका बसणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाकडुन घेतली गेली होती. यासाठी उमेदवारांची नावे देखील आयत्या वेळेत देण्यात आली होती. बविआ ला याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
    गेल्या ५ वर्षांत केलेल्या विकासकामांचे दाखले देत केलेला प्रचार, त्यामध्ये असलेली नियोजन बद्धता, व विकासकामांची आश्वासने यांच्या जोरावर पुन्हा एकदा 'शिट्टी वाजली' आहे. आता विकास 'बहुजनांचा' होतो की 'स्वजनांचा' हे आगामी ५ वर्षांत दिसुन येईलच. पण हितेंद्र ठाकुर यांच्या नियोजनबद्धतेला खरी दाद द्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीत वसईतुन झालेला हितेंद्र ठाकुर यांचा विजय, त्यांचे पुत्र क्षितीज ठाकुर यांचा नालासोपार्यातुन झालेला विजय व आता वसई-विरार महानगरपालिका निवडणूकीआधीच बिनविरोध निवडुन आलेल्या प्रविणा हितेंद्र ठाकूर याच महानगरपालिकेच्या संभाव्य महापौर असल्याने वसई विरार मध्ये 'पुन्हा ठाकूरशाहीच' आली असे म्हणावे लागेल.

प्रथमेश करजावकर.
१६-०६-२०१४

© Prathamesh Karjavkar.

Monday, June 1, 2015

"शहिदांना न्याय मिळणार तरी कधी"??














आज संपुर्ण दिवसभरात 'सौरभ कालिया' हे नाव बहुतेक न्युजचैनल्स वर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण कारगील युद्धाला आज १६ वर्षे पुर्ण होत आहेत. देशाचं रक्षण करताना आलेला तो एक दुर्देवी अंत. शहिद सौरभ कालिया यांचे भाऊ प्रा.वैभव कालीया यांच्या भेटीची आठवण शेअर करावीशी वाटते.
मे २०१० मध्ये आम्ही उत्तर भारत फिरण्यासाठी गेलो होतो. मनाली ते अमृतसर असा प्रवास करताना वाटेत हिमाचल प्रदेशातील पालमपुर हे एक निसर्गरम्य गाव लागते. १९९९ साली कारगील युद्धात शहिद झालेले कँप्टन विक्रम बात्रा आणि कँप्टन सौरभ कालिया हे याच गावचे सुपुत्र. पालमपुर गावातुनच आमची गाडी जाणार असल्याने आम्ही विक्रम बात्रा यांच्या घरी जाण्याचे निश्चीत केले. पालमपुर गावात प्रवेश करताच २ बाईकस्वारांना आम्ही गाठले आणि विक्रम बात्रा यांचे घर विचारले. कँप्टन विक्रम बात्रा यांच्या मातोश्रींनी पाणावलेल्या डोळ्यांनी बात्रा यांच्या आठवणी जाग्या केल्या. बात्रा यांचा गणवेश त्यांचा अस्थीकलश ह्या सर्व मन हेलावुन टाकणार्या आठवणी त्यांनी जतन करून ठेवल्या आहेत. बोलता-बोलतानाच कँप्टन सौरभ कालिया यांचे भाऊ वैभव कालिया यांच्याबद्दल सांगितले. त सध्या पालमपुर येथील एका विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तेथे पोहोचल्यावर प्रा.वैभव कालिया यांच्याबद्दल चौकशी केली प्रारंभी ते व्यस्त असल्याचे कळले. थोड्या वेळाने ते बाहेर येताच विद्यापीठाच्या एका कर्मचार्याने ते आल्याचे आम्हाला खुणावले. बाहेर येउन ते गाडीत त्यांच्या गाडीत बसले, ते कार सुरू करणार इतक्यातच आम्ही त्यांना गाठले. व "आप ही सौरभ कालिया के भाई है क्या" असे माझा दादा जयेश मिंडे याने त्यांना विचारले. सौरभ कालिया हे नाव ऐकताच वैभव कालिया हे ताडकन उठुन गाडीबाहेर पडले. पुढे त्यांनी "आप कौन और कैसे आना हूआ" ? असे विचारले व केवळ शहिद सौरभ कालिया यांच्या प्रेमापोटी भेटण्यास आलो आहोत हे ऐकुन त्यांनाही गहिवरून आले. शहिद कँप्टन सौरभ कालिया यांच्या बालपणीसह अनेक आठवणी त्यांनी जाग्या केल्या. नंतर त्यांनी घरी येण्यासाठी आग्रह केला मात्र आमच्या पुढील पुर्वनियोजीत दौर्यामुळे ते काही शक्य झालं नाही व आम्ही त्यांचा निरोप घेतला.
म्हणतात कि मरणानंतर वैर संपत मात्र कारगील युद्धातील या जाँबाज भारतीय वीरांच्या बाबतीत मात्र तसे घडले नव्हते. शरीरावर असंख्य भेगा, हाताची बोटे, नाक-कान कापुन हाल-बेहाल करून भारतीय सैनीकांना मारण्यात आले होते. अगदी यमराजही नाकारेल अशा अत्यंत छिन्नविच्छींन्न अवस्थेत या वीरांचे मृतदेह त्यावेळी भारतीय लष्कराच्या हाती लागले होते. दुर्दैवाने या शहीदांचे वयोवृद्ध आईवडील व कुटुंबीय हे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. निर्दयी पाकड्ये सैनीक मात्र यांना आम्हीच मारलं असं छातीठोकपणे सांगत आहेत. सध्या हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवला जावा यावरून वादविवाद सुरू आहेत. आजही कारवाई होउ शकते, गरज आहे ती केवळ राजकीय ईच्छाशक्तीची.

प्रथमेश करजावकर.
०२-०६-२०१५ 

Wednesday, March 18, 2015

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१५.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१५


महाराष्ट्रातील भाजप शासनाचा पहिला राज्य अर्थसंकल्प आज सादर झाला. राज्याच्या अर्थसंकल्पाला लोकांच्या लेखी केंद्रीय अर्थसंकल्पाएवढे महत्व नसते. अर्थात राज्याच्या आर्थिक घडीसाठी तो फार महत्वाचा असतो. याचे कारण संविधानाच्या तरतुदींनुसार केवळ राज्याच्या अखत्यारीत असणारे आर्थिक विषय मर्यादित आहेत. त्याचप्रमाणे राज्याला स्वतः निर्णय घेऊन खर्च करता येईल असे विषय मर्यादित आहेत. मात्र तरीही राज्याच्या आर्थिक आकड्यांना देशाच्या अर्थकारणात महत्व असते. विशेषतः महाराष्ट्रासारख्या विस्तृत आणि श्रीमंत आणि देशाची आर्थिक राजधानी आपली राजधानी म्हणून मिरवणाऱ्या राज्याला फार महत्व आहे. देशातील राज्यांमध्ये सकल उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे उत्पन्न १३,६५,१४९ कोटी आहे. (२०१४-१५ आर्थिक सर्वेक्षण).


या वेळच्या राज्याच्या अर्थसंकल्पात दोन गोष्टी विशेष आहेत. 
१. केंद्रात आणि राज्यात भाजपचे शासन असल्याने राज्याला मिळणारा केंद्राचा पाठींबा 
२. या वेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यांना अधिक आर्थिक भागीदारी देण्याचे सुतोवाच अर्थमंत्र्यांनी केले. त्यामुळे राज्यांना अधिक आर्थिक सक्षमता मिळण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला गेलेला अर्थसंकल्प मात्र बेधडक आणि आक्रमक दिसला नाही. उलट तो फार पारंपारिक पद्धतीने जाणारा दिसला. विश्लेषण करण्याआधी आपण अर्थसंकल्प काय होता ते पाहू.

हा अर्थसंकल्प शेतीसाठी असेल असे सांगून सुधीर मुनगंटीवारांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरवात केली. महाराष्ट्र शासन दरवर्षी ४००० कोटी व्याज देते हे सांगून मुनगंटीवरांनी आधीच्या शासनावर ताशेरे ओढले.

शेती :-
शेतीमध्ये ४% वाढ अपेक्षित केली गेली. मात्र हि अपेक्षा अवास्तव महत्वाकांक्षी वाटते. केंद्र पातळीवर १.१ % वाढ झाली आहे. ७५४० सौर उर्जेवर चालणारे पंप बसवले जातील. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल, किमान ५०% प्रकल्प ५ वर्षात पूर्ण केले जातील. यवतमाळ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कै. मोतीराम लहाने कृषी समृद्धी योजना पायलेट प्रकल्प म्हणून घोषित केली गेली. दुष्काळग्रस्तांसाठी ४००० कोटींचे पेकेज घोषित केले गेले. शेती पंपांच्या यांत्रिकीकरणासाठी ६८० कोटी दिले जातील. पारंपारिक बियाणांच्या संवर्धनासाठी १० कोटी देण्यात आले आहेत.

पाणी :-
पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार मिशन ला १००० कोटी दिले जातील. सिमेंट नाला बंध प्रकल्पाला ५०० कोटी दिले जातील. गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर मधील पाण्याच्या साठवणीच्या व्यवस्थेच्या दुरुस्ती साठी १०० कोटी दिले जातील.

पायाभूत सुविधा :-
पंतप्रधानांच्या नावे योजना काढण्याच्या केंद्राच्या पद्धतीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या नावे रस्ते बांधणी योजना अर्थ मंत्र्यांनी जाहीर केली तय्साठी १४१३ कोटी दिले आहेत. २४९३ कोटी रस्त्यान्साठी राखून ठेवले गेले आहेत. २०१५-१६ मध्ये ५००० किलो मीटर चे रस्ते पूर्ण करावयाचे आहेत असे वित्तमंत्री म्हणाले. जलविद्युत प्रकल्पांसाठी ९०० कोटी राखून ठेवले गेले आहेत. मेट्रो-३ साठी १०९ कोटी राखून ठेवले गेले आहेत. पुणे मेट्रो साठी १७५ कोटी आणि नागपूर मेट्रो साठी १९८ कोटी राखून ठेवले आहेत. सर्व बस थांब्याचे पुढील पाच वर्षात नूतनीकारण केले जाईल. या वर्षी मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर येथील बस थांब्याचे नूतनीकारण केले जाइल. २६८ कोटी स्मार्र्ट शहरे बनवण्यासाठी राखून ठेवले आहेत. स्त्रियांसाठी इ-टेक्सी योजना सुरु करण्यात येईल. कोल्हापूर, अकोला, सोलापूर, शिर्डी, कराड, अमरावती येथे विमानतळ बांधणी साठी ९१ कोटींची तरतूद केली गेली आहे. नगर विकासासाठी ६०० कोटी राखून ठेवले आहेत.

ग्रामीण :-
प्रत्येक आमदार ३ गावे " आदर्श गावे " म्हणून दत्तक घेईल. अल्पसंख्यांक ग्रामीण विकासासाठी २५ कोटी दिले जाणार आहेत. अनुसूचित विभागातील ग्रामपंचायतींना आर्थिक मदत वाढवली गेली आहेत.

घरे :-
केंद्राच्या २०२२ च्या उद्दिष्टांना अनुसरून राज्याने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना जाहीर केली गेली ज्यातून दारिद्र्यरेषेखालील अर्जदारांना रु ५०,००० घर बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी दिले जातील.

उद्योग :-
पशुपालन उद्योगासाठी १४० कोटी राखून ठेवले आहेत. महाराष्ट्रातील हस्तकला उद्योगांना वीज दर मध्ये १२३२ कोटींची सुत देण्यात येईल. मत्स्य व्यवसायासाठी सिंधुदुर्ग,रत्नागिरी , ठाणे, मुंबई आणि पालघर येथे जेट्टी बनवण्यात येतील त्यांना २० कोटी दिले जातील. उद्योगातील सृजनशीलता वाढावी म्हणून मेक इन महाराष्ट्र प्रकल्प सुरु केला जाइल. वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याजदरात ५%-७% रिबेट दिला जाईल . मिहान प्रकल्पासाठी जमीन घेण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पांना १०% भांडवली अनुदान दिले जाईल यासाठी २८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मार्केट सुरु करण्यात येतील. वर्धा येथे ग्रामोद्योग पोराशिक्षण केंद्राची स्थापना करणायत येईल. मौलाना आझाद अल्पसंख्यांक मंडळाला १५० कोटी भांडवली गुंतवणूक म्हणून दिले जातील.

वारसा :-
किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ५० कोटींची तरतूद कार्यात आली आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी तसेच जुन्या पुस्तकांच्या संरक्षणासाठी १४ कोटी मंजूर केले गेले आहेत.

पर्यावरण :-
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, संजय गांधी उद्यान, गोरेवाडा प्राणी संग्रहालय आंतरराष्ट्रीय जंगल पार्क च्या धर्तीवर विकसित केले जातील ज्यासाठी १९१ कोटी देण्यात आले आहेत. औषधी वनस्पती आणि वनोपज उत्पादनांसाठी प्रयत्न होतील.महाराष्ट्र राज्य प्राणीसंग्रहालय मंडळाची स्थापना केली जाईल ज्यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सामाजिक :-
बेटी बचाव योजनेचं धर्तीवर माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात येईल. स्वच्छ भारत अभियानासाठी ३२० कोटी रुपये राखून ठेवले जातील. पर्यावरण प्रकल्पांना ९ कोटी रुपयांची मदत दिली गेली आहे. सर्व शिक्षा अभियानाला १६९० कोटी देण्यात येतील. विविध कायदे, शासकीय पत्रके इत्यादीचे पुनर्विलोकन करून जुन्या नियमांचे नुतनीकरण करणायत येईल. प्रत्येक जिल्ह्यात एक नाट्यगृह देण्यात येईल. लोककला आणि लोक कला वाद्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न होतील. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करणायत येईल ज्यासाठी रु. २३ कोटी देण्यात येणार आहेत. बालमृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी ३०० कोटी देण्यात येतील. राष्ट्रीय आरोग्य मिशन साठी १९९६ कोटी देण्यात येतील. जे जे हॉस्पिटल सठी १००० अधिक बेड देण्यात येतील. नंदुरबार, अलिबग, मुंबई, सातारा, गोंदिया, बारामती, चंद्रपूर येथे आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी १३५ कोटींची तरतूद केली जाईल.

तरुण महाराष्ट्र :-
कै. प्रमोद महाजन स्किल डेव्हलपमेंट योजना सुरु करण्यात येईल आणि सध्याच्या सर्व योजना त्यात समाविष्ट करण्यात येतील. तालुका आणि जिल्ह्यातील क्रीडा मैदाना साठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जेजे स्कूल आणि इतर आर्ट शाळांच्या नुतनीकरणासाठी तरतूद करण्यात येईल. युपीएससी आणि एमपीएससी ची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होणार्यांना मेन्स आणि मुलाखतीसाठी तयारी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात अभ्यास केंद्रे आणि वाचनालये सुरु केली जातील. कोल्हापूर आणि नागपूर येथील प्रशासकीय सेवा आकादामिंच्या बळकटीकारणासाठी प्रयत्न केले जातील. नागपूर मध्ये फार्मसीच्या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक संस्थेची निर्मिती करण्यात येईल. उत्तर महाराष्ट्रातील अनेक मेडिकल कॉलेजेस पदव्युत्तर शिक्षणापर्यंत वाढवण्यात येतील.

स्मारके :-
छत्रपति शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मधील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हुतात्मा राजगुरू, क्रांतिवीर लखुजी साळवे, वीर बापूराव शेडमाके यांच्या स्मारकांसाठी तसेच संत सेवालाल इ समाधी स्थळांच्या विकासासाठी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपोभूमिच्या विकासासाठी निधी पुरवला जाइल. मुंबईमध्ये परमवीर चक्र मिळालेल्यांच्या सन्मानार्थ स्मारक उभारले जाइल. हुतात्मा स्मारक, कै. बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि कै. गोपीनाथ मुंडे स्मारकांच्या विकासासाठी रु२५ कोटी ची तरतूद करण्यात आली आहे.